नेरुळ येथे आरटीओ कार्यालय इमारतीच्या अंदाजपत्रकास मंजुरी
आमदार संदीप नाईक यांच्या प्रश्‍नाला शासनाचे उत्तर

वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अपुर्‍या जागेत सध्या नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाचा (आरटीओ) कारभार सुरु आहे. नागरिकांच्या सोयीसाठी सिडकोने आरटीओला दिलेल्या भुखंडावर नेरुळ येथे नविन कार्यालय केव्हां बांधण्यात येणार आहे? असा प्रश्‍न आमदार संदीप नाईक यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विचारला
होता. त्यावर शासनाने सकारात्मक उत्तर दिले असून नुतन कार्यालयाच्या बांधकामाच्या अंदाजपत्रकास आणि बांधकाम नकाशांना मान्यता देण्यात आल्याचे आमदार नाईक यांना दिलेल्या लेखी उत्तरात शासनाकडून नमूद करण्यात आले आहे.

नवी मुंबईतील वाहनचालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनांच्या नोंदी, परवाना, कर भरणा, नुतनीकरण इत्यादी कामांसाठी आरटीओ कार्यालयात मोठया संख्येने नागरिक दररोज येत असतात. सध्या एपीएमसीमधील काही खोल्यांमध्ये अपुर्‍या जागेत या कार्यालयाचा कारभार सुरु आहे. त्यामुळे नागरिक आणि आरटीओचे अधिकारी-कर्मचारी यांची मोठी गैरसोय होते आहे. आरटीओच्या नुतन काय र्ालयासाठी सिडको महामंडळाने नेरुळच्या सेक्टर १३ येथे भुखंड उपलब्ध करुन दिला आहे. या भुखंडावर आरटीओ कार्यालय इमारतीचे बांधकाम सुरु करण्याविषयी कोणती कार्यवाही करण्यात आली आहे? अशी विचारणा आमदार नाईक यांनी केली. त्याला परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी लेखी उत्तर दिले आहे. नेरुळमधील आरटीओच्या कार्यालयीन इमारतीसाठी ८ कोटी ९४ लाख ५०७०रुपयांच्या अंदाजपत्रकास तसेच त्या अनुशंगाने बांधकाम नकाशास प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री रावते यांनी आमदार नाईक यांना दिली आहे. त्यामुळे आता नेरुळ येथे आरटीओच्या नविन कार्यालयाच्या कामास गती मिळाली आहे.