घणसोलीमध्ये जॉगिंग ट्रॅक आणि दोन विरंगुळा केंद्रांकरीता आमदारनिधी आमदार संदीप नाईक यांची घोषणा
घणसोलीतील जन संवाद उपक्रमात नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
३३५ समस्यांची निवेदने प्राप्त

नवी मुंबई प्रतिनिधी
नागरिकांच्या मागणीप्रमाणे घनसोली नोडमध्ये दोन विरंगुळा केंद्रे आणि जॉगिंग ट्रॅकसाठी आमदारनिधी देण्याची घोषणा आमदार संदीप नाईक यांनी आज रविवारी केली. घनसोली नोडकरिता त्यांचा विशेष जन संवाद हा उपक्रम सेक्टर ७मधील न्यू बॉम्बे सिटी हायस्कूलमध्ये पार पडला.

सुटटीचा दिवस असूनही नागरिकांनी या कार्यक्रमासाठी मोठया संख्येने हजेरी लावून आपल्या समस्या मांडल्या. लेखी निवेदने सादर केली.
महापौर सुधाकर सोनावणे यांच्यासह लोकप्रतिनिधीवर्ग, विविध शासकीय, निमशासकीय खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.पाणीपुरवठा, मैदाने, पार्कींग, ड्रेनेज, रस्ते, सुरक्षा, कायदा आणि सुव्यवस्था, शाळा, बगीचे, महानगरगॅस, महावितरण, परिवहन इत्यादी विषयांवर ३३५ समस्यांची निवेदने प्राप्त झाली. आमदार नाईक यांनी या निवेदनांवर उपस्थित अधिकार्‍यांना कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या.
महानगर गॅसची बीले वेळेवर येत नाहीत. बील भरण्यास उशिर झाला तर कंपनी दंड आकारते, अशी तक्रार भिमराव पवार यांनी केली असता वेळेवर बीले द्या तसेच नागरिकांना माहिती देण्यासाठी कॉल सेंटर सारखी सुविधा सुरु करा, अशी सुचना आमदार नाईक यांनी महानगर गॅसचे अधिकारी सुनिल केसरकर यांना केली. घणसोली, तळवली, गोठिवली भागात गॅस जोडणीच्या सद्यस्थीतीबाबत अहवाल सादर करण्यास सांगितले.आमदार नाईक यांच्या प्रयत्नाने रबाळेतील प्रभाग २४मध्ये गॅसजोडणी प्राप्त झाल्याबददल माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील यांनी आभार व्यक्त केले. सार्वजनिक कार्यक्रमांसाठी परवानगी काढताना पालिका आणि पोलीस एकमेकांकडे टोलवाटोलवी करतात, अशी तक्रार शशिकांत मुटकुळे यांनी केली. अशा परवानगीसाठी पालिकेतर्फे एक खिडकी योजना सुरु करण्यात येईल, असे आश्‍वासन आमदार महोदयांनी दिले. परिसरात सोनसाखळी चोरीचे प्रमाण वाढल्याचे श्री परब यांनी सांगितले. उमेश यांनी रस्त्याच्या दुतर्फा होणार्‍या पार्कींगमुळे वाहतुक कोंडीत भर पडते आहे, अशी माहिती दिली. सुनिल म्हात्रे यांनी आपल्या निवेदनात घनसोलीसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी घनसोलीमध्ये पोलीसांची गस्त वाढविली आहे. पोलीस बीटचौकी दिली आहे, असे सांगून चेन स्नॅचिंग सारखे गुन्हे रोखण्यासाठी पामबीच मार्गावरील विद्युत व्यवस्था सुरळीत करण्याचे निर्देश आमदार नाईक यांनी सिडको आणि पालिकेच्या अधिकार्‍यांना दिले. आमदार निधीतून पोलीस बिटचौकी बांधून देणार असल्याची घोषणा त्यांनी केली. त्याचबरोबर सम-विषम पार्कींगचा विचारही सुरु असल्याचे ते म्हणाले. सकाळी आणि रात्रीच्या वेळेस जड वाहने घनसोली गावातून जातात त्यांना नियंत्रित करण्यासाठी पोलीस उपलब्ध नसतात, अशी माहिती नगरसेविका मोनिका पाटील यांनी दिली असता या संदर्भात लवकरच पालिका, पोलीस आणि लोकप्रतिनिधी यांची एक स्वतंत्र बैठक आयोजित करुन ही समस्या सोडविण्याची ग्वाही आमदार नाईक यांनी दिली. मधुकर पाटील आणि इतर नागरिकांनी नाले बंदिस्त करण्याचा विषय मांडला. नाला व्हिजन अंतर्गत सर्वच नाल्यांच्या कामांचे नियोजन सुरु असल्याची माहिती आमदार नाईक यांनी या निवेदनावर उत्तर देताना दिली. सेक्टर ४मधील एनएमएमटीचा बसथांबा अचानक हलविल्याची बाब हरिश्‍चंद्र यांनी निदर्शनास आणली. सतिष गायकवाड यांनी सेक्टर २७-२८ करिता बंद झालेली बससेवा पूर्ववत सुरु करण्याची मागणी केली. नगरसेवक घनश्याम मढवी यांनी एनएमएमटीच्या विद्यार्थी पास शुल्कात झालेल्या वाढीविषयी निवेदन दिले. शिवाजी धुमाळ यांनी सेक्टर ९मध्ये रात्री ११.३०नंतर बस थांबत नसल्याची तक्रार केली. घरोंदासाठीच्या बसच्या फेर्‍या नियमित करण्याची मागणी केली. एनएमएमटीच्या अधिकार्‍यांनी तातडीने कार्यवाही करुन अहवाल सादर करण्याचे आ.नाईक यांनी सुचित केले. त्याचबरोबर परिवहन संबंधी समस्या सोडविण्याठी महापौर सोनावणे यांच्यासह एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे स्पष्ट केले. संपूर्ण एमएमआरडीए भागात आधुनिक असा एनएमएमटीचा बसडेपो घनसोली येथे उभा राहत असून येत्या काही दिवसांतच त्याचे लोकार्पण करु, असा विश्‍वास आमदार नाईक यांनी बोलून दाखविला. ऐरोलीच्या सरस्वती शाळेच्या फीवाढीचा मुददा पालकांनी मांडला असता महापौर सोनावणे हे या संबधी शिक्षणाधिकार्‍यांनी आणि पालकांची बैठक घेतील, असे सांगून पालकांना दिलासा दिला. ताम्हाणे या गृहिनीने घनसोलीसाठी बालोद्यानाची आवश्यकता असल्याचे सांगितले. यावर घणसोलीचे लॅन्डमार्क ठरेल, असे सेंट्रल पार्क येथे उभे राहत असून त्याचे लोकार्पण लवकरात लवकर करु, अशी ग्वाही आमदार महोदयांनी दिली. अनेक शाळांमधून प्रकल्पग्रस्त आणि गरीबांना प्रवेश मिळत नसल्याची बाब सुनिल म्हात्रे यांनी उघड केली असता एकही विद्यार्थी प्रवेशापासून राहणार नाही, अशी ग्वाही आमदार नाईक यांनी दिली. प्रवेशाचे नियम समजून घेण्याचे कार्यकर्ते आणि समाजिक संस्थांना आवाहन केले. पालिकेच्या शाळांची पटसंख्या वाढते आहे. निकालही १००टक्के लागतो आहे याबददल त्यांनी समाधान व्यक्त केले. माजी नगरसेवक उत्तम म्हात्रे यांनी खारफुटीमुळे अपूर्ण राहिलेल्या सिडकोचा मार्ग लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी केली असता पालिका, सिडको, वनखाते यांची संयुक्त बैठक घेवून पावसाळयापूर्वी हा मार्ग दुरुस्त करण्याचा प्रयत्न करु, असे आश्‍वासन दिले. ऐरोलीच्या जॉगिंग ट्रूॅकच्या धर्तीवर घनसोली करांना जॉिंंगंग ट्रॅक उपलब्ध व्हावा, यासाठी ५० लाख रुपयांचा आमदारनिधी देण्याचे आमदार नाईक यांनी आज जाहिर केले. घनसोलीत जेटटी आणि घनसोली ते एलिफंटा अशी जल प्रवासाची सुविधा सुरु करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे ते म्हणाले. सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्‍न उपस्थित झाला असता मार्च महिन्यात आपण स्वतः सहभागी होवून घनसोलीत स्वच्छता मोहिम राबविणार असल्याचा मनोदय आ.नाईक यांनी बोलून दाखविला. बन्सी डोके यांनी विरंगुळा केंद्र नसल्याचे सांगितले असता दोन विरंगुळा केंद्रांकरिता आमदारनिधी देण्याची घोषणा त्यांनी केली. घनसोलीतील वाढत्या वायू प्रदुषणाविषयी नागरिकांनी प्रश्‍न मांडला असता विधानसभेच्या मार्च महिन्यातील अधिवेशनात हा विषय उपस्थित करणार असल्याचे आ.नाईक यांनी नमूद केले. प्रदुषणाला कोणते कारखाने जबाबदार आहेत याचे सर्व्हेक्षण सुरु असून पालिकेने या संबधीचा अहवाल सादर केल्यावर प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि शासनाच्या उद्योग विभागाकडे ही समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. संदीप गलगुडे आणि पांचाळ यांनी सिडको इमारतींची दुर्दशा आणि विविध सुविधांकडे सिडकोने केलेले दुर्लक्ष याकडे आमदार महोदयांचे लक्ष वेधले. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांच्यासोबत अलिकडेच महत्वपूर्ण बैठक झाल्याचे सांगून आमदार नाईक यांनी सिडकोकडून घनसोली नोडमध्ये सुविधापूर्ती करुन घेण्यात येत आहे. टप्प्या टप्याने कामे होत आहेत. घनसोली नोड सुविधांच्या बाबतीत नंबर १चा नोड बनेल, असे खात्रीपूर्वक सांगितले. माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील यांनी रबाळेतील खदान तलावाचे गेट आणि हायमास्ट दिव्यांचे कामे होत नसल्याबददल नाराजी व्यक्त केली असता ही कामे तातडीने सुरु करण्याचे निर्देश महापौर सोनावणे यांनी पालिका अधिकार्‍यांना दिले. प्राणीमित्र भारती यांनी भटक्या श्‍वानांविषयी प्रश्‍न उपस्थित केला असता नवी मुंबईत ऍनिमल रेस्न्यू सेंटर उभारण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती आ.नाईक यांनी दिली.

डंम्पिंगविरोधात जनआंदोलन
मुंबईतील कचरा ऐरोलीनजिक टाकण्याचा घाट घातला जातो आहे. हा कचरा येथे टाकल्यास नवी मुंबईकरांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार असून शासनाने हा निर्णय बदलला नाही तर जनआंदोलन उभे करु. प्रसंगी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची वेळ आली तरी ते करु, असा इशारा देखील आमदार संदीप नाईक यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दिला आहे. ऐरोलीत पार पडलेल्या जनसंवादात आलेल्या निवेदनांपैकी ७५ टक्के तक्रारी सुटल्या आहेत. घनसोलीमधील जनसंवादामधून आलेल्या जास्तीत जास्त तक्रारी सोडविण्याचा प्रयत्न राहणार आहे, असे त्यांनी नमूद केले.