तेरापंथ युवक परिषदेने सेवाभाव जपावा
आ. संदीप नाईक यांचे प्रतिपादन; ऐरोली येथे आचार्य तुलसी डायग्नोस्टिक सेंटरचे उद्घाटन

आज या धकाधकीच्या जीवनात मनुष्य हा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत चालला आहे. शिवाय आरोग्यविषयक सुविधांचा बाजार बनत चालला आहे. मात्र तेरापंथ युवक परिषदेच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या डायग्नोस्टिक सेंटरने नागरीकांना परवडेल अशा स्वरुपात सेवा द्यावी व अशा प्रकारे सेवा जपतानाच अनेक शाखा आपण नवी मुंबईत निर्माण कराव्यात असे प्रतिपादन आमदार संदीप नाईक यांनी येथे केले.

अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषदेच्या माध्यमातून ऐरोलीमध्ये पहिल्या आचार्य तुलसी डायग्नोस्टिक सेंटरचे उद्घाटन आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते ऐरोली (से. ३) येथे करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे दिनेश पारख, माजी युवक अध्यक्ष जयेश कोंडे, अखिल भारतीय युवक परिषदेचे अध्यक्ष देवेंद्र बोहरा, मंत्री राकेश डुंगरवाल, कोशाध्यक्ष गौतम चंडालिया, संयोजक हिम्मत कोठारी, संयोजक मनोज कच्छारा, जितमलजी कच्छारा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते, आ. संदीप नाईक म्हणाले की, आताच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात आलेल्या बाजारीकरणाला आळा बसविण्यासाठी किंवा नागरिकांना अल्प दरात आरोग्यविषयक सोयीसुविधा पुरविता याव्यात म्हणून तेरापंथ युवक परिषदेच्या माध्यमातून अनेक सामाजिक, आरोग्यविषक उपक्रम नेहमी राबविले जातात.
त्याचाच एक भाग म्हणून ऐरोलीमध्ये नागरीकांच्या सोयीसाठी पहिल्या डायग्नोस्टिक सेंटरचे उदघाटन संपन्न झाले आहे, शिवाय या ठिकाणी इतर डायग्नोस्टिक सेंटर पेक्षा रक्कम ही ३० % च आकारण्यात येणार असल्याने नागरिकांच्या खिशाला कात्रीही लागणार नाही, अशा अनेक शाखा आपण नवी मुंबईत निर्माण कराव्या व नागरिकांची सेवा करावी.अखिल भारतीय तेरापंथ युवा परिषदेच्या संपूर्ण भारतात १६ शाखा असून ऐरोलीत त्यांच्या १७ व्या शाखा सुरु करण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून आरोग्यविषयक रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर तसेच शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक उपक्रम राबविले जात आहेत.