सिडको एमडी संजय भाटिया आणि आमदार संदीप नाईक यांच्या बैठकीत
नवी मुंबईतील अनेक प्रलंबित विषयांची तड

आमदार संदीप नाईक यांनी आज सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांची भेट घेतली. या बैठकीत नवी मुंबईतील अनेक प्रलंबित आणि जिव्हाळयाच्या विषयांची तड लागली आहे. अतिशय सकारात्मक वातावरणात ही बैठक आज मुंबई येथील सिडकोचे मुख्यालय निर्मल भवनात झाली.

ग्रामस्थांच्या हिताची योजना आणा
सिडकोच्यावतीने सध्या गावठाण भागात सुरु असलेली अन्यायग्रस्त कारवाई त्वरीत थांबवा, अशी आग्रही मागणी आमदार नाईक यांनी बैठकीत केली. तसेच ग्रामस्थांशी चर्चा करुन त्यांच्या हिताची गावठाण विकासाची योजना आणण्याची मागणी देखील केली. या मागणीवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्‍वासन सिडकोच्या वतीने देण्यात आले.

ग्रामस्थ आणि फोर्टी प्लस संघासाठी मैदाने उपलब्ध होणार
गावांमध्ये क्रीडा संस्कृती वाढविण्यासाठी तसेच या दृष्टीेने गेली अनेक वर्षे काम करणार्‍या फोर्टी प्लसच्या संघांसाठी मैदाने उपलब्ध करुन देण्याची मागणी आमदार नाईक यांनी केली. त्यावर ज्या गावांमध्ये मैदाने उपलब्ध आहेत त्या ठिकाणी त्या मैदानांचा विकास करुन देवू. ज्या ठिकाणी मैदाने उपलब्ध नाहित त्या ठिकाणी ती उपलब्ध करुन देवू, असे आश्‍वासन सिडकोच्या वतीने देण्यात आले.

घनसोली नोडमधील विकासकामांना चालना
घनसोली नोडमधील सिडकोच्यावतीने केली जाणारी विकासकामे तसेच पायाभूत सुविधांची कामे लवकरात लवकर करण्याची सुचना आमदार नाईक यांनी केली असता पुढच्या आठवडयात आमदार नाईक यांच्या समवेत सिडकोच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी संयुक्त पाहणीदौरा करण्याचे निर्देश श्री भाटिया यांनी बैठकीत दिले.
घनसोली नोडमध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी ज्या ठिकाणी पालिकेसोबत संयुक्तपणे विकासकामे करण्याची गरज आहे त्या ठिकाणी अशी कामे करण्यास सिडकोचे बैठकीत सहमती दर्शविली आहे.

कोपरखैरणेत सुसज्ज पोलीस ठाणे
कोपरखैरणे विभागासाठी सुसज्ज पोलीस ठाणे मिळावे यासाठी आमदार नाईक प्रयत्नशील होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे सिडको या ठिकाणी तीन माळयांचे सुसज्ज पोलीस ठाणे बांधणार असून त्या अनुषंगाने निविदा प्रकीया लवकरच सुरु करणार असल्याची माहिती सिडकोच्या वतीने बैठकीत देण्यात आली.
कोपरखैरणेच्या धर्तीवर ऐरोली विभागात सुसज्ज पोलीस ठाणे बांधण्याकरिता भुखंड देण्यात यावा, अशी मागणी देखील आमदार नाईक यांनी सिडकोकडे केली आहे.

महावितरणच्या उपकेंद्रांकरिता मिळणार भुखंड
नवी मुुंबईत वीज सुधारणा घडवून आणण्यासाठी आमदार संदीप नाईक यांनी महावितरणच्या इन्फ्रा २ योजनेअंतर्गत मोठया प्रमाणावर कामे मंजुर करुन घेतली. ही कामे सध्या शहरात सुरु आहेत. सुरळीत विज पुरवठयासाठी त्यांनी महावितरण कंपनीच्या उपकेंद्रांसाठी भुखंडाची मागणी सिडकोकडे केली होती. त्यानुसार येत्या १५ दिवसांत याविषयी सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे बैठकीत सिडकोच्या वतीने सांगण्यात आले.

ऐरोली विधानसभा मतदारसंघासाठी मल्टीपर्पज युटीलिटी ङ्गॅसिलिटी सेंटर
ऐरोली विधानसभा मतदार संघासाठी मल्टीपर्पज युटीलिटी ङ्गॅसिलिटी सेंटर बांधून देण्यात यावे, अशी मागणी आमदार नाईक यांनी बैठकीत केली असता त्यावर श्री भाटिया यांनी सकारात्मक भुमिका मांडली.

पालिकेला उर्वरित सुविधा भुखंडाचे लवकरच वितरण..
सिडकोकडून पालिकेला सुविधा भुखंडांचे वितरण सुरु आहे. त्याला गती देण्यासाठी आमदार नाईक प्रयत्नशील असून या बाबतीत त्यांनी बैठकीत विचारणा केली असता पुढील आठवडयात बैठक घेवून उर्वरित भुखंड वितरित करण्याविषयी कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सिडकोच्या वतीने सांगण्यात आले. सिडको दक्षिण नवी मुंबईत महामुंबई वसवित असून या भागाप्रमाणेच उत्तर नवी मुंबईत नवी मुंबई पालीका क्षेत्रात विकासकामे करण्याची मागणी आमदार नाईक यांनी बैठकीत केली.

साडेबारा टक्के भुखंडांचे जलदगतीने वाटप
सिडकोच्या वतीने प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के भुखंडाचे वाटप सुरु आहे. मात्र ही प्रक्रीया संथ असून त्याची गती वाढवावी त्याचप्रमाणे भूमिहीन शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या ४० मिटरचे भुखंड वाटपाची गती देखील वाढवावी, अशी सुचना आमदार नाईक यांनी केली असता ही प्र्रक्रीया जलदगतीने करण्यात येईल, असे सिडकोने बैठकीत नमूद केले.

आजच्या महत्वपूर्ण बैठकीस महापौर सुधाकर सोनावणे, सिडकोच्या वतीने सह व्यवस्थापकीय संचालिका व्ही राधा, सिडकोचे वरिष्ठ अधिकारी, पालिकेचे सभागृहनेते जे.डी.सुतार, नगरसेवक सुरज पाटील, नगरससेवक घनश्याम मढवी, माजी नगरसेवक केशव म्हात्रे, माजी नगरसेवक संजय पाटील, नगरसेवक विनोद म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.