नवी मुंबईतील स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांच्या रिक्षा परवान्यांसाठी विधानसभेत आवाज उठविणार आमदार संदीप नाईक यांची माहिती
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांची घेतली भेट


रिक्षा परवान्यांसाठी अलिकडेच काढण्यात आलेल्या लॉटरीमध्ये नवी मुंबईतील स्थानिक आणि प्रकल्पग्रस्त अर्जदारांवर अन्याय झाला असून त्यांना रिक्षा परवाने मिळाले पाहिजेत याकरिता विधानसभेच्या

मार्च महिन्यात होणार्‍या अधिवेशनामध्ये आवाज उठविणार असल्याची माहिती आमदार संदीप नाईक यांनी दिली आहे.
आमदार नाईक यांनी आज आरटीओ अधिकारी श्री. धायगुडे यांची भेट घेतली. एमएमआरडीए विभागासाठी अलिकडेच रिक्षा परवान्यांची सोडत काढण्यात आली. नवी मुंबईतील अनेक स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांनी रिक्षा परवाने मिळावेत याकरिता ऑनलाईन अर्जही केले होते. परंतु त्यांच्या पदरी निराशा पडलेली आहे. हे सर्व स्थानिक आणि प्रकल्पग्रस्त अत्यंत गरजू असून रिक्षा परवाने मिळाले नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. ही बाब आमदार नाईक यांनी लेखी निवेदनाव्दारे आरटीओ श्री. धायगुडे यांच्या निदर्शनास आणली आहे. एकीकडे स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांवर अन्याय झालेला असताना दुसरीकडे रिक्षा परवान्यांसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता ज्यांनी केली नाही अशा अनेक जणांना रिक्षा परवाने प्राप्त झाल्याचा आरोपही आमदार नाईक यांनी केला आहे. आ. नाईक यांनी उपस्थित केलेला विषय शासनाकडे कळवू , असे आश्‍वासन धायगुडे यांनी दिले. धायगुडे यांची भेट घेतल्यानंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना आ. नाईक यांनी सांगितले की नवी मुंबईतील स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांना प्राधान्याने रिक्षा परवाने मिळावेत यासाठी परिवहन मंत्र्यांची भेट घेणार आहे. त्याबरोबर विधानसभेच्या मार्च महिन्यामध्ये होणार्‍या अधिवेशनातही याविषयी आवाज उठविणार आहे.
आरटीओ धायगुडे यांच्या भेटीप्रसंगी आ. नाईक यांच्यासोबत दिलीप म्हात्रे, परशुराम ठाकूर, नगरसेविका उषा भोईर, नगरसेवक निवृत्ती जगताप, हरिष वाघमारे आदी उपस्थित होते.