कारवार्ई थांबवा, प्रकल्पग्रस्त आणि दिघावासियांच्या हिताची योजना आणा
आमदार संदीप नाईक यांनी औचित्याचा मुद्दा मांडून विधानसभेत जोरदार मागणी केली.

नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त आणि दिघा येथील पिडीत रहिवाशांच्या हिताची योजना तात्काळ आणावी आणि तोपर्यंत या रहिवाशांच्या बांधकामावर सुरू असलेली कारवाई त्वरीत थांबवावी, अशी जोरदार मागणी आ. संदीप नाईक यांनी पावसाळी अधिवेशना दरम्यान आज औचित्याच्या मुद्याद्व्रारे विधानसभेमध्ये केली.
ंविधानसभेमध्ये औचित्याच्या मुद्याच्या माध्यमातून हा विषय मांडताना आ. नाईक म्हणाले, भर पावसाळ्यात गावठाण प्रकल्पग्रस्त आणि दिघा येथील सर्वसामान्यांच्या बांधकामांवर सिडको, एमआयडीसी आणि नवी मुंबई महानगरपालिका या प्राधिकरणांच्या

माध्यमातून बांधकाम तोडण्याची कारवाई सुरू आहे. या कारवाई विरोधात येथील नागरिकांमध्ये प्रचंड संताप असून मोर्चे, आंदोलने करून त्यांनी आपला संताप वेळोवेळी व्यक्त केला आहे. मात्र या घटकांच्या मागण्यांवर अद्यापही शासनाने कार्यवाही केली नाही.
आ. नाईक यांनी औचित्याचा मुद्दा मांडताना प्रकल्पग्रस्त आणि दिघा वासियांच्या भावनांना वाट करून देत या भावना अतिशय तीव्र असल्याचे नमूद केले. मुख्यमंत्री महोदय आणि शासनाने प्रकल्पग्रस्त तसेच दिघावासियांच्या हिताची योजना तात्काळ जाहीर करावी आणि तोपर्यंत या घटकाच्या बांधकामांवर अन्यायकारक कारवाई सुरू आहे ती तात्काळ थांबवावी, अशी मागणी केली.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आ. नाईक यांनी विधिमंडळाच्या आवारात आंदोलन केले. प्रकल्पग्रस्तांच्या सूचनांचा अंतर्भाव करून गावठाण विस्तारासाठी सर्वसमावेशक योजनांचा जीआर तातडीने प्रसिद्ध करावा, अशी मागणी केली आहे. गेली सात वर्षे आ. नाईक प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी मंत्री स्तरावर, सिडको महामंडळाबरोबर भेटीगाठी, पत्रव्यवहार, विधिमंडळ अधिवेशनामध्ये लक्षवेधी सूचना, तारांकित प्रश्‍न, औचित्याचा मुद्दा इत्यादी माध्यमातून अविरतपणे पाठपुरावा करीत आहेत. त्याचबरोबर दिघावासियांची घरे नियमित करण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न केले आहेत.