नवी मुंबई शिक्षण संकुलाच्या सराव परिक्षेमुळे मुख्य परिक्षेत विद्यार्थ्यांना धवल यश
लोकनेते गणेश नाईक यांचे कौतुकोदगार

नवी मुंबई प्रतिनिधी
नवी मुंबई शिक्षण संकुलाच्या वतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणार्‍या एस.एस.सी.च्या सराव परिक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या मनातील मुख्य परिक्षेची भिती नाहिशी होवून आत्मविश्‍वास निर्माण होतो आणि मुख्य परिक्षेच्या निकालात अधिक चांगले यश प्राप्त होते, असे कौतुकोदगार लोकनेते गणेश नाईक यांनी काढले आहेत.
शिक्षण संकुलाच्या या सराव परिक्षेचा शुभारंभ कोपरखैरणे येथील रा.फ.नाईक विद्यालयात श्री.नाईक यांच्या हस्ते शनिवारी दुपारी करण्यात आला. त्याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी व्यासपिठावर नवी मुंबई शिक्षण संकुलाचे अध्यक्ष आमदार संदीप नाईक, राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. संजीव गणेश नाईक, माजी महापौर सागर नाईक, महापौर सुधाकर सोनावणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि परिक्षेचे मुख्य प्रबंधक अनंत सुतार, परिक्षेचे मुख्य समन्वयक प्रा. प्रताप महाडिक, श्रमिक शिक्षण मंडळाचे सचिव सुरेश नाईक पालिकेच्या शिक्षण समितीचे माजी सभापती एकनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सराव परिक्षेचा उपक्रम गेली १० वर्षे सातत्याने आयोजित करीत असल्याबददल लोकनेते नाईक यांनी शिक्षण संकुलाच्या पदाधिकार्‍यांचे कौतुक केले. एसएससी बोर्डाच्या धर्तीवर भव्य प्रमाणात परिक्षा घेण्याचा असा उपक्रम राज्यात कुठेही नसल्याचे सांगितले. मुख्य परिक्षेला सामोरे जाण्यापूर्वी या सराव परिक्षेतून विद्यार्थ्यांना त्यांच्या उणिवा कळतात त्या वेळीच दूर करता येतात यामुळे मुख्य परिक्षेस बसताना मनातील भिती नाहिशी होते आणि निकालाची टक्केवारी वाढते, या शब्दात त्यांनी या सराव परिक्षेची उपयुक्तता सांगितली.
शिक्षण संकुलाचे अध्यक्ष आमदार संदीप नाईक यांनी आपल्या प्रास्ताविकात लोकनेते गणेश नाईक यांच्या प्रेरणोतून सुरु झालेल्या सराव परिक्षा उपक्रमाने १० वर्षे पूर्ण केल्याबददल समाधान व्यक्त केले. गेल्या १० वर्षात एक लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या परिक्षेचा लाभ घेवून मुख्य परिक्षेत घवघवीत यश मिळविल्याचे ते म्हणाले. सराव परिक्षा आणि मुख्य परिक्षेच्या निकालामध्ये फारशी तफावत नसते, असे नमूद करुन या परिक्षेचे यश अधोरेखित केले. यावर्षीच्या परिक्षेचे वैशिष्टय म्हणजे उत्तर पत्रिकांची तपासणी एकाच मध्यवर्ती ठिकाणी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
लोकनेते गणेश नाईक यांच्या प्रेरणेतून नवी मुंबई शहरात अनेक लोकोपयोगी उपक्रम सुरु झाले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून अशक्य गोष्टी शक्य झाल्याचे महापौर सोनावणे म्हणाले. शिक्षण संकुलाच्या सराव परिक्षेची व्याप्ती वाढल्याचे नमूद केले.
यावर्षीच्या सराव परिक्षेस नवी मुंबई आणि परिसरातील १०,६०० विद्यार्थी बसले आहेत. एकूण २२ केंद्रातून ही परिक्षा मराठी आणि इंग्रजी माध्यमातून घेतली जात आहे. ७९ शाळांचा सहभाग आहे. १४ जानेवारीपासून सुरु झालेली ही परिक्षा ५ फेब्रुवारीपर्यत सुरु राहणार आहे.