वीज समस्या सोडविल्या नाहीत तर रस्त्यावर उतरू
आमदार संदीप नाईक यांचा महावितरणला इशारा
भाजपाचे सरकार आल्यानंतर वाढीव बिलाने ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच नवी मुंबई शहरामध्ये मोठया प्रमाणावर विजेच्या समस्या असून अघोषित भर नियमनाचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे. महावितरणने भेडसाविणार्‍या समस्या तातडीने न सोडविल्यास रस्त्यावर उतरून महावितरण विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार संदीप नाईक यांनी दिला आहे. आज(ता.२१) मंगळवारी आ.नाईक यांच्या नेतृत्वाखाली

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्यावतीने वाशी येथील महावितरणचे विभागीय अधिकारी मानकर यांना विविध समस्यांबाबत घेराव घालण्यात आला. त्यानंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना आ.नाईक यांनी हा इशारा दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या माध्यमातून नवी मुंबईतील सीबीडी, नेरुळ, घणसोली, वाशी, कोपरखैरणे, ऐरोली, दिघा आदी परिसरातील महावितरणच्या समस्यांबाबतचे लेखी निवेदन यावेळी अधिकार्‍यांना देण्यात आले.
नवी मुंबईतील घणसोली, तळवली, गोठीवली या भागात विजेच्या समस्यांचा डोंगर निर्माण झाला आहे.नागरिकांना येणारी भरमसाठ बिले, जुने मीटर काढल्यानंतर ई-रिडींग नुसार येणारे अतिरिक्त विद्युत देयक, उघडया विद्युत वाहिन्या आणि महत्वपुर्ण अशा वारंवार खंडीत होणार्‍या विजपुरवठया बाबत आ.नाईक यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना विचारणा केली. घणसोली सारख्या भागात ग्राहकांना महावितरणच्या लोडशेडीगंचा फटका बसला असून अनेक नागरिकांच्या घरातील महागडी विद्युत उपकरणे जळाली आहेत. या प्रकाराला महावितरणच जबाबदार असून अधिकार्‍यांना आ.नाईक यांनी चांगलेच फैलावर घेतले.
शहरातील अनेक भागात सध्या केबल टाकणे अनिवार्य असताना दुसरीकडे महावितरण कर घेत असताना सुध्दा विद्युत साहित्याचा पुरवठा करीत नाही. त्यामुळे ग्राहकांना खिशातील पैसे टाकून केबल जळाल्यास नवीन केबल टाकावी लागत असल्याची बाब आ.नाईक यांनी अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली.नेरुळ, वाशी, कोपरखैरणे, तळवली गाव, पावणे गाव, घणसोली, करावे गाव इत्यादी भागात वारंवार वीज गायब होते. या ठिकाणी विजेची मागणी जास्त आहे. त्यामुळे अस्तित्वातील ट्रान्सफॉर्मरवर वीजेचा जास्त भार पडतो. त्यामुळे या ठिकाणी जादा ट्रान्सफॉर्मर बसविण्याची मागणी आ.नाईक यांनी केली.
सर्व ठिकाणच्या उघडया केबल, उघडया डीपी, ट्रान्सफॉर्मर युनिट बंदिस्त करण्याची सूचना अधिकार्‍यांना केली. रोड क्रॉसिंगमध्ये वीेजेची केबल टाकताना ती ४ फूट खोल टाकणे अपेक्षित आहे परंतु अशा केबल केवळ १ फूट खोल टाकल्या जातात, असे निदर्शनास आले आहे. एखादे जड वाहन रस्त्यावरुन गेल्यावर या केबल तुटतात.
त्यामुळे या केबल ४ फूट खोल टाकून त्याला सुरक्षित आवरण द्यावे, अशी मागणी केली. शहरात सर्व्हेक्षण करुन अशा केबल सुरक्षित करण्याची मोहिम महावितरणने हाती घ्यावी, असेही ते म्हणाले. यावेळी आमदार नाईक यांच्या समवेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अनंत सुतार, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला जिल्हा अध्यक्षा माधुरी सुतार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष राजू शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष अशोक पाटील, माजी उपमहापौर भरत नखाते, नगरसेवक प्रकाश मोरे, नगरसेवक देविदास हांडे पाटील, नगरसेवक शंकर मोरे, नगरसेवक घनश्याम मढवी, नगरसेवक लीलाधर नाईक, नगरसेवक निवृत्ती जगताप, नगरसेविका संगीत बोर्‍हाडे, नगरसेविका मोनिका पाटील, नगरसेविका उषा भोईर, नगरसेविका सीमा गायकवाड, नगरसेविका शुभांगी पाटील, नगरसेविका भारती पाटील, नगरसेवक पुरुषोत्तम भोईर, माजी नगरसेवक तात्या तेली, माजी नगरसेवक रविकांत पाटील, माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील, परिवहन सदस्य श्याम म्हात्रे, समाजसेवक नारायण शिंदे, समाजसेवक संदीप म्हात्रे, समाजसेवक शिवाजी जाधव आदी राष्ट्रवादीचे नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
नुकताच पावसाळा सुरु झाला आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी विजेच्या समस्या निर्माण झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी लोकप्रतिनिधीकडे मांडल्या आहेत.पावसाळयात महावितरणने त्यांची आपत्कालिन व्यवस्था सक्षम आणि जागरुक ठेवावी, त्याच बरोबर पावसाळ्यात हेल्पलाईन सुरु करावी आणि पावसाळ्यातील धोकादायक स्थितीचा आढावा महावितरणच्या अधिकार्‍यांनी करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
- संदीप नाईक. आमदार

 
आमदारांनी मांडलेल्या विविध सूचनांची महावितरणने दखल घेतली आहे. प्राप्त झालेया निवेदनावर तात्काळ करावी करण्यात येईल. घणसोली येथील स्थिती पाहता येत्या २४ तासात विजेच्या समस्याबाबतचा आढावा घेउन त्याची पुर्तता करण्यात येईल.
- सी.बी.मानकर, वाशी विभागीय अधिकारी.