विजेच्या समस्या १०० टक्के दूर करा आमदार संदीप नाईक यांची मागणी
महावितरणच्या मुख्य अभियंत्यांची घेतली भेट

गेल्या काही दिवसात नवी मुंबईतील विविध भागात खंडीत होणारा वीजपुरवठा या आणि इतर महत्वाच्या वीज समस्यांची सोडवणूक करा, या मागणीसाठी शुक्रवारी आमदार संदीप नाईक यांनी महावितरणच्या भांडूप परिमंडळाच्या मुख्य अभियंत्या पुष्पा चव्हाण यांची वाशी येथील महावितरणच्या कार्यालयात भेट घेतली. वीज समस्या १०० टक्के नाहिशा करुन नागरिकांचे समाधान करावे, असे त्यांनी चव्हाण यांना सूचित केले. वीज उपकरणे दुरुस्तीची कामे पूर्ण करुन कर्मचारी भरतीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्य अभियंत्या चव्हाण यांनी याप्रसंगी आमदार नाईक यांना दिले.

गेल्या १० दिवसात दिघा, ऐरोली, रबाळे, तळवली, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, वाशी, एमआयडीसीमधील रहिवासी भाग अशा सर्वच भागांत अचानक वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार वाढल्याने नागरिक त्रस्त आहेत. वीजविषयक इतर समस्या देखील कायम आहेत. याची गंभीर दखल घेत आमदार नाईक हे लोकप्रतिनिधी आणि नागरिकांसह मुख्य अभियंत्या चव्हाण यांना भेटले. आमदार नाईक यांनी त्यांना वीज समस्यांविषयक सविस्तर माहिती दिली. यापूर्वी देखील आमदार नाईक यांनी विभागनिहाय वीज समस्यांची छायाचित्रे आणि माहिती महावितरणच्या अधिकार्‍यांना दिली होती. मात्र त्यापैकी केवळ १०टक्केच कामे झाल्याचे आमदार नाईक यांनी चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिले. अनेक भागात आजही उघडया डिपी आणि उघडया केबल आहेत ज्यामुळे अपघात घडत आहेत. नागरिकांचे प्राण जात आहेत, याकडे लक्ष वेधून आमदार नाईक यांनी पावसाळयाच्या पार्श्‍वभूमीवर उघडया डिपी बंद करुन तसेच उघडया केबल भूमिगत करण्याची मागणी केली. घणसोली विभागात वीज ग्राहकांची संख्या ४० हजारांच्या वर गेली आहे. येथील विजेची मागणी देखील वाढली आहे. मात्र वीजपुरवठा अपुरा आहे त्यामुळे घणसोलीसाठी स्वतंत्र सबस्टेशन निर्माण करण्याची मागणी त्यांनी केली. कामे होत नाहीत यासाठी महावितरणचे अधिकारी अपुरे कर्मचारी आणि अपुर्‍या निधीची कारणे सांगतात. ही कारणे न सांगता वाढीव कर्मचारी भरतीसाठी तसेच निधीसाठी या अधिकार्‍यांनी वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव पाठवावा. वीजविषयक सुविधा प्रभावीपणे देण्यासाठी सिडको, महापालिका आदी प्राधिकरणांबरोबर महावितरण कंपनीने संयुक्त बैठका घ्याव्यात. जी वीजेची कामे झाली आहेत किंवा होत आहेत त्याचा दर्जा चांगला असावा. भविष्यात ही कामे सुस्थितीत राहावीत यासाठी प्रतिबंधात्मक देखभाल करावी. अशा उपयुक्त सूचना महावितरणच्या अधिकार्‍यांना करतानाच नागरिकांनी आणि पोलिसांनी देखील सार्वजनिक ठिकाणची वीजेची उपकरणे नागरिकांची संपत्ती असल्याने त्यांची हानी होणार नाही, याची दक्षता सामाजिक जाणिवेतून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. आजच्या भेटीनंतर १० दिवसांनी पुन्हा एकदा महावितरणच्या अधिकार्‍यांबरोबर आढावा बैठक घेवू. किती कामे मार्गी लागली, याची माहिती घेवू, असे आमदार नाईक यांनी प्रसिध्दी माध्यमांना सांगितले. वीज समस्या आणि आवश्यक वीज सुविधांची माहिती महावितरणच्या अधिकार्‍यांना देत राहू मात्र नागरिकांचे समाधान होईपर्यंत कामे पूर्ण झाली नाहीत तर मात्र नाईलाजास्तव महावितरणच्या विरोधात आंदोलन करावे लागेल, असा इशाराही आमदार नाईक यांनी दिला आहे. मुख्य अभियंत्यांना भेटण्यास गेलेल्या शिष्टमंडळात आमदार नाईक यांच्यासोबत नगरसेवक देविदास हांडे-पाटील, नगरसेवक शंकर मोरे, नगरसेवक घनश्याम मढवी, नगरसेवक निवृत्ती जगताप, नगरसेवक लिलाधर नाईक, माजी नगरसेवक केशव म्हात्रे, नगरसेविका भारती पाटील, माजी नगरसेवक रविकांत पाटील, समाजसेवक संदीप म्हात्रे,नगरसेवक लक्ष्मण पाटील, नगरसेविका सायली शिंदे, समाजसेवक नारायण शिंदे, दाजी सणस, माजी परिवहन सभापती मोहन म्हात्रे, राष्ट्रवादीचे कोपरखैरणे वॉर्ड अध्यक्ष मारुती सकपाळ, सुभाष राजगुरु, संतोष कोंढाळकर आदी उपस्थित होते.