ऐरोली-डोंबिवली मार्गाकरीता मंजुर्‍यांचे काम प्रगतीपथावर
आमदार संदीप नाईक यांच्या प्रश्‍नाला मुख्यमंत्री फडणवीस यांचे उत्तर

नवी मुंबईतील नागरिकांना थेट डोंबिवली आणि डोंबिवलीतील नागरिकांना थेट नवी मुंबईत प्रवास करता यावा यासाठी प्रस्तावित ठाणे- बेलापूर ऐरोली ते डोंबिवली उन्नत मार्गाचे काम लवकरात लवकर सुरु व्हावे, यासाठी आमदार संदीप नाईक शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. सदरच्या मार्गाचे काम प्रत्यक्षात कधी सुरु होणार आहे? असा लेखी प्रश्‍न अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी विचारला होता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर दिले असून या मार्गासाठी लागणार्‍या विविध मंजुर्‍या घेण्याचे तसेच इतर अनुशंगिक कामे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) तर्फे सुरु असल्याची माहिती या उत्तरात देण्यात आली आहे. एमएमआरडीए ने विस्तारित मुंबई नागरी पायाभूत सुविधा

प्रकल्पांतर्गत ऐरोली- कटाईनाका(डोंबिवली) हा प्रकल्प हाती घेतला आहे. या मार्गाकरीता वन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे तसेच सीआरझेडची परवानगी घेण्याचे काम सुरु आहे. याशिवाय मार्गासाठी जमिनी अधिग्रहित करण्याची प्र्रक्रीया देखील प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पासाठी खर्चाचे अंदाजपत्रक तयार करुन त्यास मान्यता घेण्यात येईल त्यानंतर निविदा प्रक्रीया करणे अशाप्रकारची कार्यवाही सुरु असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार नाईक यांना दिलेल्या लेखी उत्तरात नमूद करण्यात आले आहे.

ऐरोली-डोंबिवली मार्गाची वैशिष्टयेः
एकूण लांबी १२.३ किलोमिटर
सदर मार्ग काही ठिकाणी उन्नत तर काही ठिकाणी जमिनीलगत
पारसिक टेकडयांमधील बोगद्यांचा अंतर्भाव
एमएमआरडीएच्या निधीतून काम प्रस्तावित